मुंबई : अक्षय कुमारच्या २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओ माय गॉड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. पहिल्या भागात अभिनेत्याने श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती आता दुसऱ्या भागात अक्षय कुमार भगवान शंकराच्या अवतारात दिसणार आहे. नुकताच सोशल मीडियावर या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे.
‘ओ माय गॉड २’ चित्रपटात आस्तिक आणि नास्तिक यांच्यातील मतभेद दाखवण्यात आले आहेत. टीझरमध्ये अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा जबरदस्त अंदाज दिसत आहे. चित्रपटात केसांच्या लांब जटा, कपाळाला भस्म, गळ्यात रुद्राक्षांची माळ असा अक्षय कुमारचा लुक असणार आहे. इन्स्टाग्रामवर टीझर शेअर करत अक्षय कुमारने “रख विश्वास” असे कॅप्शन दिले आहे.