नवी दिल्ली : प्रत्येक कामासाठी महत्वाचे असलेले आधार कार्ड आता सोबत ठेवण्याची गरज नाही. आधार कार्डाची ईलेक्ट्रॉनिक प्रतही आता सर्वत्र चालणार आहे. तुम्ही तुमचे ई-आधार कुठेही वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला ‘फिजिकल कार्ड’ बाळगण्याची गरज नाही.
आधार कार्डप्रमाणेच ‘ई-आधार कार्ड’मध्ये तुमचा बायोमॅट्रिक डेटा, बायोमॅट्रिक तपशील, आधार क्रमांक फोटो आणि ईतर तपशील यासारखी सर्व आवश्यक माहिती असते. यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख आणि लिंग यांचा समावेश आहे. तुमचे आधार कार्ड हरवले किंवा तुम्हाला फिजिकल कार्ड हरवण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही ई-आधार कार्ड डाउनलोड करू शकता.
सर्व प्रथम तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक आवश्यक असेल. तुमच्याकडे आधार नसेल तर तुम्ही नाव नोंदणी क्रमांक वापरू शकता.
त्यानंतर यूआयडीएआय (UIDAI) वेबसाइटवर जावे लागेल. तेथे तुम्हाला आधार ऑनलाइन सेवांवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर दिसणाऱ्या मेन्यू मध्ये डाऊनलोड आधारवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर सर्व तपशील भरावा लागेल. यात एनरोलमेंट आयडी, आधार क्रमांक, व्हीआयडी, पूर्ण नाव, पीन कोड, सुरक्षा कोड असेल.
हा तपशील भरल्यानंतर ओटीपी वर क्लिक करावे लागेल. आधारकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही तुमच्या आधारची पीडीएफ डाऊनलोड करू शकता. आधारचा पासवर्ड तुमच्या नावातील पहिले चार अक्षर आणि जन्माचे वर्ष असा असेल.